लोणी काढणे : एक खानदानी संस्कार
५० वर्षापूर्वी लहान असताना मनावर बिंबवले जायचे जी मुलगी लग्न झाल्यावर लोणी काढू शकेल तीच खरी गृहिणी. आई, आज्जी, काकू अशा ज्येष्ठ स्त्रिया घरातील मुलीना हे काम आवर्जून सांगायच्या. आणि हे किचकट काम नको वाटायचे.
लोणी काढणे हे काम म्हटले तर महत्वाचे, म्हटले तर क्षुल्लक आहे. प्रपंचात लोणी काढण्याचा गृहिणी शब्दाशी अर्थाअर्थी संबंध नाही,असे वाटते. हे काम ज्याच्या त्याच्या काळ, काम वेगावर अवलंबून असते हे खरे.
तरीही घराघरात असणारी पद्धत सर्वसाधारण अशीच ;-
रोज लागणारे दूध सकाळी एकदा तापवले की त्याच्यावर साधारण २ तासांनी येणारा सायीचा थर विरजण करण्यासाठी एका स्वच्छ काचेच्या किंवा स्टीलच्या वाडग्यात काढून घेणे. दुसऱ्यांदा जेव्हा केव्हा दूध तापवले जाते तेव्हा पुन्हा एकदा अशीच साय त्याच वाडग्यात काढून घेणे.. हे भांडे रोज फ्रिजमध्ये ठेवणे. चार एक दिवसांनी हे सायीचे वाडगे भरले की रात्री आंबट ताकाचा चमचा विरजण म्हणून एकच दिशेने गोल फिरवून हे भांडे रात्रभर बाहेर ठेवणे. दुसऱ्या दिवशी रवी किंवा मिक्सर वर घुसळून त्याचे ता क करणे. ताक करतेवेळी घुसळतानाच लोण्याचा गोळा वर येतो. हा गोळा दिसला रे दिसला की सकाळी सकाळी मन प्रसन्न होते.
(टीप -. असे ताजे घरचे लोणी काढले की, ब्रेड सँडविच, भाजणीचे थालीपीठ किंवा लोणी डोसा घरी आवर्जून करावा, लज्जत काही औरच.)
वीणा कुलकर्णी

घरचे लोणी





